नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिन्यातील एक दिवस जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक माहिती देण्यात यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्याकारी अधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक के.डी.सातपुते, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी कायद्यासोबत नागरिकांना नियमांचे पालन करण्याची सवय असणेदेखील महत्वाचे आहे. त्यासाठी शिस्तपालन करणारी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांविषयी जाणून घ्यावे आणि अपघात कमी करण्यासाठी सहकार्य करावे. सोबतच वेगवान वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री.पंडीत म्हणाले, जिल्ह्यात गतवर्षी 10 टक्के अपघात कमी करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले. मात्र यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत अपघातांची संख्या जास्त आहे. अपघात कमी करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. असे केल्यास कायद्यानुसार पालकांनादेखील शिक्षा करण्याची तरतूद आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यात आणि अपघात कमी करण्यासाठी नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री.गावडे म्हणाले, नियमांचे पालन केल्याने 70 टक्के अपघात टाळता येतात. त्यासाठी जनजागृती उपक्रमात वर्षभर सातत्य ठेवावे. अपघातामुळे होणारे मृत्यू किमान 20 टक्के कमी करण्याचे उद्दीष्ट ठेऊन रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती घडवून आणावी. वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
श्री.बच्छाव यांनी सादरीकरणाद्वारे वाहतूक नियमांची माहिती दिली. वाहनांची वाढती संख्या, व्यसन घेऊन वाहन चालविणे, युवकांचा अतिउत्साह, वाहनांची दुरुस्ती वेळेत न करणे, खराब हवामान, वाहतूकीचे अयोग्य नियोजन यामुळे अपघात होतात. अपघात टाळण्यासाठी चार ‘ई’ अर्थात कायद्याची अंमलबजावणी, शिक्षण, अभियांत्रिकी आणि तात्काळ आरोग्य सुविधा महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नागपूर-सुरत महामार्गावर विसरवाडीजवळ झालेल्या अपघाताचेवेळी मदतकार्यात चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर वाहतूक निरीक्षक अविनाश मोरे यांनी केले. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.