नंदुरबार  – कोरोना संकटात सामान्य माणसाची भूक भागविण्यासाठी शिवभोजन थाळी उपयुक्त ठरली आहे. 1 मार्चपासून 18 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील 13 केंद्रावरून सुमारे 63 हजार थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे सामान्य माणसाला संकटातही दिलासा मिळाला आहे.

कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असताना या कालावधीत गरजूंना दोन वेळचे भोजन मिळावे यासाठी शिवभोजन थाळीचा इष्टांक दीडपट वाढविण्यात आला. गरीब आणि गरजूंना दिलासा देण्यासाठी 15 मे पर्यंत ही थाळी मोफत वितरीत करण्यात येत आहे.

गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अक्कलकुवा तालुक्यात 5 हजार 990, अक्राणी 5 हजार 95, नंदुरबार 13 हजार 6, नवापूर 5 हजार 630, शहादा 5 हजार 991 आणि तळोदा तालुक्यात 5 हजार 877  अशा एकूण 62 हजार 815 थाळ्यांचे वितरण थाळ्यांचे वितरण करण्यात आले.

सकाळी 11 ते दुपारी चार या कालावधीत इष्टांकानुसार या थाळ्यांचे वितरण होत आहे. लॉकडाऊन काळात पार्सलची सुविधाही देण्यात  येत आहे. कोरोनाने रोजगाराचे प्रश्न निर्माण केले असताना या थाळीमुळे माणसाची भूक भागविण्याचे काम होत आहे.