नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार येथील कोविड केअर सेंटर त्वरीत सुरू करावे आणि लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्या ठिकाणी स्थलांतरित करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
कोविड-19 बाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावात एकही कोरोना बाधित आढळल्यास संपर्कातील सर्व व्यक्तींची स्वॅब चाचणी करावी. चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यापैकी कोणीही घराबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी आपल्या तालुक्यात संसर्ग कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
प्रत्येक कोरोना बाधिताला त्वरीत सीसीसी किंवा कोविड रुग्णालयात नेण्यात यावेत. सीसीसीमधील भोजन व इतर सुविधा चांगल्या दर्जाच्या राहतील याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. क्रीडा प्रशिक्षण आणि पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करताना आवश्यक खबरदारी घेण्यात यावी. नंदुरबार आणि शहादा शहरात प्रत्येक नागरिक मास्क घालेल याकडे विशेष लक्ष द्यावे.
नंदुरबार आणि शहादा तालुक्यात फिरत्या स्वॅब चाचणी पथकांची संख्या वाढविण्यात यावी. इतर चार तालुक्यांसाठी एक फिरते पथक नियुक्त करावे. यामुळे गावात शिबीर घेतल्याने स्वॅब देणाऱ्यांची संख्यादेखील वाढेल. संपर्क साखळी खंडीत होईपर्यंत संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेणे सुरू ठेवावे. कोविड बाधितांच्या वाहतूकीसाठी वाहनांची सुविधा करण्यासाठी, वाहन दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी उपस्थित होते.