नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  अक्कलकुवा तालुक्यातील नागरिकांना कोविड काळात चांगली सेवा देणाऱ्या जामिया रुग्णालयाचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कौतुक केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी  या रुग्णालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या कोविड कक्षाला भेट दिली. जामिया इन्स्टिट्यूटतर्फे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयात 8 ऑक्सिज खाटा, 21 इतर खाटांसह सर्व प्रकारच्या रक्तचाचण्या  आणि डिजीटल एक्स-रेची सुविधा आहे. दुर्गम भागातील जनतेसाठी रुग्णालयातर्फे अल्पदरात दिली जाणारी सेवा महत्वाची आहे. सेवाभावी वृत्तीने शुल्कात सवलतही दिली जात असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. रुग्णालयात कोविड खाटांची संख्या वाढवावी अशी सूचना त्यांनी केली.

इन्स्टिट्यूटमधील रुग्णालाच्या माध्यमातून गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचारांना प्राधान्य देण्यात येत असून जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार खाटांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे जामिया इन्स्टिट्यूटचे मौलवी हुजेफा वस्तानवी यांनी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,  प्र.तहसिलदार रामजी राठोड आदी उपस्थित होते.