नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आदिवासी विकास योजना आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 261 अंगवाडी इमारत बांधकामास गेल्या वर्षभरात मंजूरी देण्यात आली आहे. नवीन अंगणवाडी बांधकाम आणि 2016 पासून अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे.
पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या निर्देशानुसार आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जमाती उपयोजना (टीएसपी) अंतर्गत 200 अंगणवाड्यांसाठी 11 कोटी 81 लाख 80 हजार वितरीत करण्यात आली आहे. तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 61 अंगणवाड्यांना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2 कोटी 90 लाख 80 हजाराचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
टीएसपी अंतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा 95, धडगाव 46, तळोदा 12, शहादा 19, नंदुरबार 8 आणि नवापूरमधील 20 अशा 200 अंगणवाड्यांचा समावेश आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा 1, मोलगी 4, धडगाव 16, खुंटामोडी 3, तळोदा 5, शहादा 13, म्हसावद 6, नंदुरबार 6, रनाळा 6 नवापूरमधील 1 अशा 61 अंगणवाड्यांचा समावेश आहे.
तसेच अंगणवाडी दुरुस्तीसाठी टीएसपी अंतर्गत 95 अंगणवाड्यांसाठी 93 लाख 59 हजार वितरीत करण्यात आले आहेत, तर आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत 18 अंगणवाड्यांना दूरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी 9 लाख 20 हजार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
टीएसपी अंतर्गत दुरुस्तीसाठी मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये अक्कलकुवा 19, धडगाव 3, तळोदा 23, शहादा 21, नंदुरबार 25 आणि नवापूरमधील 4 अशा 95 अंगणवाड्यांचा समावेश आहे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत दुरुस्तीसाठी मंजूरी देण्यात आलेल्या अंगणवाड्यांमध्ये शहादा 8, रनाळा 10 अशा 18 अंगणवाड्यांचा समावेश आहे
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मोहिम स्तरावर इमारतीचे बांधकाम व्हावे म्हणून आवश्यक मंजूरी दिली आहे. तसेच आढावा बैठकीत 2016 पासून प्रलंबित बांधकामही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी जूने बांधकामही तातडीने पूर्ण करून ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. एका महिन्यात अशा 15 अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी 7 अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून 99 चे बांधकाम सुरू आहे. अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी संदर्भ आरोग्य सेवा, अनौपचारीक शिक्षण, आरोग्यविषयक शिक्षण आदी सेवा पुरविल्या जातात. अंगणवाडी नसल्याने ग्रामीण भागात या सेवा पूर्ण क्षमतेने देण्यात अडचणी निर्माण होतात. अमृत आहार व घरपोच आहार वाटपासाठीदेखील अंगणवाडी महत्वाची आहे. अंगणवाडी बांधकामामुळे या समस्या दूर होणार आहेत.