नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम उपयुक्त ठरत असून त्याअंतर्गत 1100 व्यक्तींना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. यापैकी 734 व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यातील 82 व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात  18 लाख 72 हजार लोकसंख्येपैकी 16 लाखाहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात अक्कलकुवा 2 लाख 34 हजार, धडगाव 2 लाख 21 हजार, नंदुरबार 3 लाख 41 हजार, नवापूर  2 लाख 47 हजार, शहादा 3 लाख 85 हजार आणि तळोदा तालुक्यातील 1 लाख 70 हजार नागरिकांचा समावेश आहे. त्यासाठी 3 लाख 53 हजार घरांना आरोग्य पथकांनी भेटी दिल्या. जिल्ह्यातील दुर्गम भागातही  पथकांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली आणि कोरोनाबाबत दक्षतेच्या सूचना दिल्या.

सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी 7689 व्यक्तींना रक्तदाब, 159 कर्करोग, 5585 मधुमेह,  इतर आजार 1231 आणि 296 व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. त्यांना कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. 274 व्यक्तींना ताप, 34 घसादुखी तर 72 व्यक्तींमध्ये एसपीओ-2 चे प्रमाण 95 पेक्षा कमी आढळले. या सर्वांपैकी 1100 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.  स्वॅब चाचणीसाठी मोबाईल पथकांचे सहकार्य घेण्यात आले.

जिल्ह्याने ऑनलाईन नेांदणीतही चांगली कामगिरी केली असून 70 टक्के  नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या कामगिरीच्या बाबतीत जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य पथकांनी अनेक अडचणीतून मार्ग काढत कोरोना प्रतिबंधासाठी घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. वेळीच नागरिकांना संदर्भित केल्याने आणि त्यांची कोरोना चाचणी केल्याने संसर्ग बऱ्याच अंशी रोखण्यात प्रशासनाला मदत होणार आहे.

मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी आरोग्य पथकांना सहकार्य केले. काही गावांनी नागरिकांचे समुपदेशन करून स्वॅब चाचणी शिबिरांचेदेखील आयोजन केले. या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोना बाधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य झाले आहे.