नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत सर्व सहा तालुक्यात आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी 1 लाख 6 हजार 259 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण 10 लाख 22 हजार 82 घरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गावात आरोग्य तपासणी आणि कोरोनाविषयक जनजागृतीचे काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजनदेखील करण्यात येत आहे. आरोग्य तपासणीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब तपासणी करून संबधित व्यक्तीस उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक माहितीदेखील देण्यात येत आहे.
एकूण 482 पथकामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी 23 हजारापेक्षा अधिक घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. आतापर्यंत 2 लाख 28 हजार 385 घरांना भेटी देण्यात आल्या. नंदुरबार तालुक्यातील 2 लाख 2 हजार 61, अक्कलकुवा 1 लाख 35 हजार 6, धडगाव 1 लाख 62 हजार 260, नवापूर 1 लाख 75 हजार 490, शहादा 2 लाख 47 हजार 597 आणि तळोदा तालुक्यातील 99 हजार 668 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मोहिमेला गती देण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वत: सर्वेक्षणाच्या ठिकाणी भेट देत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणीचे सूक्ष्म नियोजन केले असून सर्वेक्षणाची माहिती ऑनलाईन नोंदविण्यात येत आहे. सर्वेक्षणात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्यात येत आहे.