नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारीत संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांच्याकडून शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मुल्यसाखळी विकास, मुल्यसाखळी विकासाची उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उपप्रकल्पासाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

            अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारीत संस्थांमध्ये आत्मा नोंदणीकृत शेतकटी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियांनातर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचलित साधन केंद्र यांचा समावेश आहे.  तर खरेदीदार संस्थामध्ये राज्यातील तसेच राज्याबाहेरील कॉपोरेट, प्रक्रियादार, निर्यातदार, लघू मध्यम उद्योजग, स्टार्टअप्स, कोणताही खरेदीदार आदींचा समावेश आहे.

            प्राप्त होणाऱ्या अर्जांपैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाचे 60 टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येईल. अर्ज सादर करण्यासाठीचे पात्रतेचे निकष व अर्जाचा नमुना आदी माहितीसाठी https://www.smart-mh.org यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.