नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या वादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे त्वरीत करून मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवा. घराचे नुकसान झालेल्यांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.
वादळाने नुकसान झालेल्या शहादा तालुक्यातील डोंगरगाव, सोनवल,तसेच तळोदा तालुक्यातील बोरद आणि मोड गावांची पाहणी केल्यानंतर तळोदा येथील विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्यमाकर वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आर.एम.चव्हाण, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, पंकज लोखंडे , मुख्याधिकारी सपना वसावा, गट विकास अधिकारी सी.टी.गोसावी, सावित्री खर्डे, जि.प.सभापती अभिजित पाटील, रतन पाडवी आदी उपस्थित होते.
ॲड. पाडवी म्हणाले, वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात यावे. शेतपीकांच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे त्वरीत करावे. ग्रामीण भागातील वाहतूक सुरळीत राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. जखमी व्यक्तींना आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल यादृष्टीने प्रयत्न करावे. पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन पावसाळ्यात अशा समस्या येऊ नये यासाठी त्वरीत उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
ते म्हणाले, वादळग्रस्तांना अन्नधान्य खराब झाले असल्यास पुरवठा विभागाअंतर्गत धान्य पुरविण्यात यावे. घराची पडझड झाली असल्यास शबरी आवास योजनेतंर्गत घरकुल देण्यात यावेत. न्यूक्लियस बजेट योजनेतून वादळग्रस्ताना पत्रे देण्याबाबत विचार असून त्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. विद्युत विभागाने वादळग्रस्त भागातील पडलेले विद्युत खांब, विद्युत रोहित्राची (डीपी) त्वरीत दुरुस्ती करावी.जुने झालेले खांब व विद्युत तारा बदलुन घ्याव्यात. वादळामुळे नुकसान झालेल्याना शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त मदत कशी देता येईल याबाबत पाठपुरावा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे वादळामुळे झालेल्या घरांच्या पडझडीची पाहणी केली. त्यांनी घरातील महिलांशी संवाद साधून त्यांना मदतीचे आश्वासन दिले. वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या केळीबागेची पाहणी करून शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना संबधितांना केल्या.
त्यानंतर सोनवल गावात झालेले घरांचे नुकसान आणि पोल्ट्री फार्मच्या नुकसानीची पालकमंत्री पाडवी यांनी पाहणी केली. पडलेल्या घरातील नागरिकांना शबरी घरकूल योजनेतून घरकूल देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांची सोय तात्पुरत्या स्वरुपात समाज मंदिरात करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. वादळग्रस्त नागरिकांना शासनामार्फत अन्नधान्य देण्यात येईल. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही ॲड.पाडवी यांनी दिली.
त्यांनी तळोदा तालुक्यातील बोरद आणि मोड गावाला भेट देऊन वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. वादळग्रस्तांना शासनातर्फे सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. त्यांना तातडीने मदत मिळविण्यासाठी प्रशासनाते त्वरीत उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.