नंदुरबार : जिल्ह्यात दर महिन्याच्या मंजूर आवंटनानुसार खत प्राप्त होणार असल्याने शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व आवश्यक तेवढेच खत खरेदी करावे. तसेच कृषी सेवा केंद्रांनी जादा दराने कृषि निविष्ठा विक्री केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील यांनी कळविले आहे.
जिल्ह्यासाठी खरीप हंगामात 1 लाख 10 हजार 875 मे. टन रासायनिक खतांची उपलब्धता होणार आहे. मागील शिल्लक साठा व या हंगामात आजपर्यंत प्राप्त खते मिळून 25527 मे. टन एवढे पुरेसे रासायनिक खत आता उपलब्ध असून उर्वरीत खत मागणीप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यात येणाऱ्या खरीप हंगामात जवळपास 289800 हे. क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी इ. प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्यासाठी आवश्यक निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.
रासायनिक खत विक्रेत्याने शासनाकडून जाहीर झालेले दरपत्रक दर्शनी भागावर लावावे. कोणत्याही विक्रेत्याने लिंकिंग करु नये अथवा जादा दराने निविष्ठ विक्री करु नये. जादा दराने विक्री केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.