नंदुरबार : कोविड-19 संसर्गामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करण्यासाठी अनेक नागरिक आणि संस्था मदतीसाठी पुढे सरसावले असून मुख्यमंत्री सहायता निधीला 19 लाख 22 हजार 148 आणि पीएम केअर निधीसाठी 8 लाख 65 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
संकट सुरू झाल्यापासून अनेक व्यक्ती आणि संस्थांनी मदत कार्यात प्रशासनाला सहकार्य केले. भोजन व्यवस्था, मजूरांना निवारा, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा स्वरुपात मोठ्या प्रमाणात मदत झाली. काहींनी मास्क,सॅनिटायझर आणि साबणाचे ग्रामीण भागात वाटप केले.
संकट मोठे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. वृद्धांपासून सहकारी संस्थांपर्यंत अनेकांनी आपापल्यापरिने योगदान दिले आहे. नागरिकांनी मदत कार्यासाठी पुढे यावे आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19 या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा फोर्ट मुंबई येथे स्वतंत्र बँक खाते असून खाते क्रमांक 39239591720 आहे. शाखा कोड 00300 तर आयएफएससी कोड एसबीआयएन 0000300 आहे. देणगीसाठी आयकर अधिनियम 1961 च्या 80 (जी) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.