नंदुरबार : कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून जास्त जोखिमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात यावेत, असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.
श्रीमती गावीत म्हणाल्या, राज्य सीमेवर नाकाबंदी अधिक कडक करण्यात यावी. बाहेरील जिल्ह्यातील नागरीक येणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेरच्या राज्यातून आलेल्या जिल्ह्यातील मजूरांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात यावीत. बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात यावे. बँकेतने गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती सुरू करावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात 5 व्हेंटीलेटर असून आणखी 10 व्हेंटीलेटर लवकरच उपलब्ध होतील. सॅनिटायझार आणि एन-95 मास्क पुरेशा प्रमाणात आहेत. कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
मनरेगाच्या माध्यमातून 282 ग्रामपंचायतींनी कामे सुरू केली असून 8 हजार मजूर कामावर आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या रोजगारावर प्रभाव पडू नये यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट 40 टक्के पूर्ण झाले असताना यावर्षी विशेष मोहिमेच्या माध्यामातून ते 80 ते 90 टक्क्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत् एकही वेळेस कर्ज न घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
रस्त्यांच्या व रुग्णालय दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून नियमांचे पालन न करणाऱ्या 4 रास्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदार गावीत म्हणाले, बाहेरून येणाऱ्या मजूरांना आपल्या इतर गावात क्वॉरंटाईन करावे.यासाठी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. इंडिया पोस्ट पेमेंट बँक व बँक अधिककृत ग्राहक सेवा केंद्रांच्या प्रतिनिधींची संख्या वाढवावी. नागरिकांना अन्नधान्य नियमानुसार योग्य प्रमाणात मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असून पोलीसांना सुरक्षा कीट आणि सॅनिटायझर देण्यात आल्याची माहिती श्री.पंडीत यांनी दिली.
बचत गटातील महिलांद्वारे 12 हजार मास्क बनविण्यात आले असून त्यांचे आशा कर्मचारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आल्याची माहिती श्री.गौडा यांनी दिली.
बैठकीस कृषी, रोहयो, बँक, सहकार, बांधकाम आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.