नंदुरबार(प्रतिनिधी)- संपूर्ण देश लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम भागातील हजारांवर स्थलांतरित मजूर गुजरातमध्येे अडकलेेेे असून, त्यांचे हाल होत आहेत. त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचेेे वाटप करावे, अशी मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली आहे. वेळोवेळी गुजरात प्रशासनाला कळवून देखील सकारात्मक पाउले उचलण्यात येत नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धडगाव,अक्कलकुवा तालुक्यातील बाराशे ते तेराशे मजूर अहमदाबाद, बारडोली, सुरत, जुनागड जिल्ह्यात मोलमजुरी साठी गेलेले आहेत. स्थलांतरीतांमध्ये मिरची तोडणारे, खाजगी गुळाच्या गुऱ्हाळावर व साखर कारखान्यात काम करणारे मजूर आहेत. त्यांच्या मालकांचे म्हणणे आहे की, आम्ही आत्तापर्यंत मदत दिली परंतु, आत्ता आम्हाला सर्वांनाच काम नसल्याने खाऊ घालते अवघड आहे. त्यामुळे गुजरात सरकारला विशेषता त्या-त्या जिल्ह्यातील तहसीलदारांना आम्ही लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने वेळोवेळी विनंती करूनही, कुठलेही सकारात्मक पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे मजुरांचे अतोनात हाल होत आहेत.
महाराष्ट्र शासनाने गुजरात सरकारशी संपर्क करून जिल्ह्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील स्थलांतरित मजुरांना तात्काळ किराणा व स्वच्छतेसाठी साबण उपलब्ध करून द्यावे. अन्यथा या मजूरांना महाराष्ट्राच्या सीमेवर घेऊन येऊन तिथे कॅम्प करून ठेवण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. मध्यप्रदेशातील सातशे मजुरांना महाराष्ट्रात रोज ताजे व पौष्टिक जेवण, त्यांच्या लहान मुलांना दूध यासारख्या सोयी व स्वच्छ निवाऱ्याची सोय केली आहे. गुजरातमध्ये गेलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांच्या बाबतीतही गुजरात सरकारने अश्याच प्रकारे नियोजन करावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.