शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील यांचा पत्रपरिषदेत आरोप
जि.प.निवडणूकीत शिवसेनेच्या सच्चा सैनिकांवर अन्याय!
नंदुरबार/ प्रतिनिधी- (जगदिश ठाकूर)
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवारीपासून सच्चा शिवसैनिक वंचित राहिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनाही आता शिवसैनिकांची सेना नसून ती आता माजी आ.रघुवंशी यांच्या सैनिकांची शिवसेना झाली आहे. रस्त्यांवर आंदोलने करुन शिवसेना टिकवून ठेवणार्या खर्या शिवसैनिकांवर अन्याय झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नंदुरबार तालुका प्रमुख रमेश पाटील यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.
नंदुरबार येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपात प्रवेश केला आहे. त्यानिमित्त रमेश पाटील यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही तळागाळातील शिवसैनिक असून खर्या अर्थाने शिवसेनेसाठी कार्य केले. परंतू, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतून सच्चा शिवसैनिक डावलला गेला आहे. आणि नुकतेचे शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आ.रघुवंशी यांच्या सैनिकांना उमेदवारी देवून संधी देण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील अनेक शिवसैनिक नाराज असून सुरुवातीपासून पक्षाचे संघटन करणार्या सच्चा शिवसैनिकाला जि. प. निवडणूकीपासून वंचित रहावे लागले आहे. हे केवळ माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सच्चा शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे देखील जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी करीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला करुन भाजपात प्रवेश केला आहे. गट व गणातील सच्चा शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्हाप्रमुखांनीही प्रयत्न केले. परंतू त्यांच्या हातात पक्षाचे एबी फॉर्म नसल्याने तेही काही करु शकले नसल्याचे पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
राग रास्त; पण प्रमुख पदावर असतांना समजून घ्यावे!
शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश पाटील यांचा राग रास्त आहे. परंतू सर्वच शिवसैनिक व ज्यांनी पक्षावर विश्वास ठेवून शिवसेनेत आले, त्यांच्याही कार्यकर्त्यांना डावलता येवू शकत नाही. कुणाला डावलने अथवा पाठींबा देणे असा प्रकार नव्हे. आणि पक्षाने असे मुद्दाम केले नसून उमेदवारी न मिळाल्यातून नाराजी होत असते. मात्र रमेश पाटील हे सेनेच्या तालुका प्रमुख पदावर होते, म्हणून त्यांनी समजून घेतले पाहिजे.
डॉ.विक्रांत मोरे
जिल्हाप्रमुख शिवसेना. नंदुरबार.