नंदुरबार (जिमाका वृत्त) – जिल्ह्यातील हत्तीपाय रुग्णांची पायाच्या सुजेवरुन तीव्रता तपासणी करुन त्यानुसार दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार असून आता हत्तीपाय रुग्णानाही दिव्यांगाच्या सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी रविंद्र सोनवणे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमातंर्गत हत्तीपाय व अंडवृध्दी हे हत्तीरोग आजाराचे लक्षण असून हत्तीपाय रुग्णांमध्ये ठराविक वृध्दीनंतर रुग्णाचा हालचालीवर कमालीची बंधने येतात. रुग्ण मुक्तपणे फिरु शकत नाही त्यामुळे ठोस कृती कार्यक्रम आखुन या रुणांना दिलासा देण्यासाठी अशा रुग्णांची तपासणी करुन दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या आहेत.
त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे नुकतेच दिव्यांग प्रमाणपत्रासाठी हत्तीपाय रुग्णांची तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात एकूण 21 हत्तीपाय रुग्णांच्या पायाच्या सुजेवरुन तीव्रता तपासणी करण्यात आली असून त्यानुसार त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार असून त्यांनाही आता दिव्यांगाच्या सर्व सुविधा मिळतील.
या शिबीरास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पंकज बागुल, जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व हिवताप आरोग्य पर्यवेक्षक व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.