नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रहिवासी दाखला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत दिला जाणार असल्याची असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या 29 ऑगस्ट,2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची मान्यता मिळाली आहे. तरी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव कार्यक्षेत्रातील सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) रहिवासी दाखला प्रकल्प कार्यालयात रहिवासी दाखला मिळणार आहे.
हा दाखला मिळण्यासाठी उमेदवारांनी तहसिलदारांचे अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र, उमेदवार राहत असलेला पाडा हा पेसा क्षेत्रात येत असल्याबाबतचे महसुल ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा शासकीय दुध डेअरीच्या मागे, शहादा रोड तळोदा, जि.नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी केले आहे.