नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ज्ञान ही एक शक्ती आहे, चांगल्या ज्ञानार्जनासाठा ग्रंथांशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज ग्रंथोत्सव-2022चे उद्घाटन प्रसंगी केले.
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय नंदुरबार ग्रंथोत्सवाचे उद्धाटन इंदिरा मंगल कार्यालय,नंदुरबार येथे आज श्रीमती.खत्री यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, मुख्याधिकारी अमोल बागूल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, साहित्यिक प्रा.डॉ.पितांबर सरोदे, दिनानाथ मनोहर, डॉ.सुनंदा पाटील, प्रभाकर भावसार, आदिवासी मौखिक साहित्य परिषदचे संयोजक भिमसिंग वळवी प्रा.लियाकतअली सय्यद, निंबाजीराव बागुल, प्रा.माधव कदम, प्रा.विष्णू जोधळे, श्रीराम दाऊतखाने, प्रविण पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, आजच्या इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती आपणांस दररोज उपलब्ध होत असते परंतू अजूनही चांगले ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना आणि वाचनाला पर्याय निर्माण होवू शकलेला नाही. पुस्तकातून जी परीपूर्ण माहिती मिळते ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळत नाही त्यामुळे पुस्तकांना अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचीच पुस्तके वाचता गुणवत्तावाढीसाठी इतर पुस्तकांचे वाचन करावे. त्यामुळे आकलन क्षमतेत वाढ होते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्षातून किमान चार ते पाच पुस्तके वाचावित असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
प्रथम सत्रात आज वाचन संस्कृती काल-आज-उद्या याविषयावर डॉ.सुनंदा पाटील व प्रभाकर भावसार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यानंतर श्रीमती.खत्री यांनी विविध ग्रंथस्टॉलला भेट देवून पुस्तके खरेदी केली.
विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी आज ग्रंथोत्सवास भेट दिली. यावेळी संयोजन समितीच्यावतीने त्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देवून स्वत: काही पुस्तके खरेदी केली.
ग्रंथोत्सवाची सुरुवात नंदुरबार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी यांच्या हस्ते भारतीय संविधान ग्रंथपुजन करुन ग्रंथदिंडीस सुरुवात करण्यात आली. ग्रंथदिंडी नेहरुपुतळ्यापासून- गांधी पुतळामार्गे- भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल चौक मार्गे- इंदिरा मंगल कार्यालय, नंदुरबार येथे पोहचली. ग्रंथदिंडीत कमला नेहरु कन्या विद्यालय, जी.टी.पी महाविद्यालय, एस.ए. मिशन हायस्कुलच्या विद्यार्थ्यांसह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनात विविध प्रकाशकांचा सहभाग
ग्रंथोत्सावानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनात शासकीय ग्रंथाकार, औरगांबाद, आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ, विमल कीर्ती प्रकाशन,चाळीसगांव, सुशांत बुक डेपो,नंदुरबार, सुजय बुक हाऊस,धुळे, दिपस्तंभ प्रकाशन,जळगाव यांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले असून याठिकाणी विविध वाचनीय पुस्तके ठेवण्यात आली आहेत.
ग्रंथोत्सवात उद्या होणारे कार्यक्रम
ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (6 डिसेंबर) 12.30 ते 1.30 वाजता कवी शांताबाई शेळके, श्री.वसंत बापट, श्री.शंकर रमाणी यांच्या जन्म शताब्दी निमित्त ‘परीसंवाद कार्यक्रम ’, दुसरे सत्र दुपारी 1.00 ते 2.30 वाजता ‘स्थानिक कवींचे कवी संमेलन’, तिसऱ्या सत्रात दुपारी 3.00 ते 4.00 दरम्यान आझादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वांतत्र्य लढ्यात ‘खान्देशचे योगदान’ या विषयावर कार्यक्रम. तसेच यानंतर ग्रंथोत्सव-2022 चासमारोप कार्यक्रम होणार आहे. या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीराम दाऊतखाने यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विष्णू जोधळे यांनी केले. या कार्यक्रमास प्रशांत बागुल, प्रा.विकास पाटील, प्रा.मनोज शेवाळे प्रा.गणेश पाटील, किशोर पाटील, संजय मोहिते, मितलकुमार टवाळे डॉ.गिरीष पवार यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी नागरीक, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.