नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नंदुरबार याचेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने 23 ते 25 फेब्रुवारी 2022 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तसेच भ्रमणध्वनीद्वारे घेण्यात येणार आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला नोंदणी क्रमांक व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.  नोंदणी न केलेल्यांनी शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल.  तो वापरुन पोर्टलवर लॉगीन करावे. त्यानंतर आपल्या नोंदणीच्या माहितीतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर मधील दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील नंदुरबार जिल्हा निवडून त्यातील रोजगाराची माहिती पहावी व  रिक्तपदांची माहिती पाहून नोंदणी करावी.  त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या 02564-295805 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.  या मेळाव्याचा इच्छुक उद्योजक आणि बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त वि.रा. रिसे यांनी केले आहे.