नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार शहरात शनिवार 22 एप्रिल, 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आंतरराष्ट्रीय कथा प्रवचनकार पंडीत प्रदिप मिश्रा हे नंदुरबार येथे श्री.छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल इमारतीच्या उद्धटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे सिमेलगत जिल्ह्यातून तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक तसेच कार्यकर्ते वाहनांनी नंदुरबार येथे येण्याची शक्यता असल्याने शनिवार 22 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 18 वाजेपर्यंत नियमनाचे अनुषंगाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रहदारी अंशत: वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.
उक्त कालावधीत दोंडाईचा कडून येणारी लहान मोठी चारचाकी वाहने, बसेस, अवजड वाहने ही चौपाळा फाटाकडून चौपाळे गावातून सरळ उमर्दे रोड ओलांडून होळ तफे हवेली मार्गे पुढे नंदुरबार शहराकडे शहराबाहेरील उड्डाणपुला खालून करण चौफुली मार्गे जातील. साक्री , नवापूर कडून येणारी व शहादा किंवा गुजरात राज्याकडे जाणारी वाहने ढेकवद येथून पाचोराबारी, करणखेडा, वाकाचार रस्ता मार्गे शहादा ,गुजरात राज्यात जातील. करण चौफुली कडून येणारी वाहने शहराबाहेरील उड्डाणपुला खालून होळ हवेली गावातुन उमर्दे गाव पुढे वावद मार्गे दोडाईचाकडे तसेच साक्रीकडे जाणारे वाहने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली मार्ग साक्री व नवापूरकडे जातील.
प्रकाशा चौफुली कडून नंदुरबारकडे येणारी वाहने शहादामार्गे दोंडाईचा व पुढे धुळेकडे जातील. वाका चार रस्ता कडून येणारी वाहने वाका चार रस्ता ते सरळ प्रकाशामार्गे शहादाकडे जातील असे आदेशात नमूद केले आहेत.