नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागातून होणारे नागरिकांचे  स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर देण्यात यावा आणि त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे सुरू करण्यात यावीत,  असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड .के.सी.पाडवी यांनी दिले.

               जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, तहसिलदार उल्हास देवरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे आदी उपस्थित होते.

               ॲड.पाडवी म्हणाले, सातपुडा हिरवागार करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. वन विभागाने अस्तंबा शिखर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. उत्पन्न देणाऱ्या प्रजातिंची प्राधान्याने लागवड करण्यात यावी. पाझर तलावाची  आणि गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात यावी.

                वाहतूक नियमाविषयी जनजागृतीवर भर देण्यात यावा. ट्रॅक्टरच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावण्यात यावेत. वाहतूक नियमांचे कठोरतेने पालन करण्यासोबत वाहनचालकांना आवश्यक माहिती देण्यात यावी,  असे  निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्र्यानी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती, नवापूर येथील बर्ड फ्यू, महाआवास अभियान प्रगती बाबत आढावा घेतला. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर देण्यासाठी कार्यवाहीला गती द्यावी, असेही ॲड.पाडवी म्हणाले.

               यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यात 55 हजारापेक्षा अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आसून त्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. गृह विलगीकरण निर्णयाचा चांगला परिणाम झाला असून  त्यामुळे संसर्ग नियंत्रित करण्यात यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

               बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.