नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती जिल्ह्यात दहा दिवस अभिनव पद्धतीने साजरी करण्यात येत आहे.
या सप्ताहांच्या अनुषगांने आज ‘संविधान जागर’ या विषयावर अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा होळ तर्फे हवेली जि. नंदुरबार येथे तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.रामचंद्र परदेशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.
या कार्यक्रमांस समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर, गृहपाल गणेश देवरे, समाज कल्याण निरीक्षक सिताराम गांगुर्डे, प्रदीप वसावे, समाज कल्याण विभागातील निवासी शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना प्रा.परदेशी यांनी ‘भारताचे संविधान व आपले हक्क’ या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. आज आपल्याला जे संविधानिक हक्क मिळालेले आहे. त्यामुळेच आज आपण मोठया निर्भयतेने फिरू शकतो, अन्यायाविरूध्द वाचा फोडू शकतो, सन्मानाने शिक्षण घेवू शकतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी सहायक आयुक्त नांदगांवकर यांनी भारतासारख्या देशात हजारो जाती, पंथामध्ये विभागलेल्या या देशाला एकत्र आणण्याचे काम भारताच्या संविधानात असलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या विचारामुळेच प्राप्त झालेले आहे. संविधानात असलेल्या मुलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वामुळे प्रत्येक भारतीयाला एक आदर्श परिपाठ दिलेला आहे. म्हणून संविधानाचे आपल्या जीवनात अन्यनसाधारण महत्व आहे.
कार्यक्रमाच्या सुरवातीस निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘भारताचे संविधान’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले. सुत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.