नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ‘शासन आपल्या दारी ’ अभियानाच्या माध्यमातून विविध विभागामार्फत जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने येत्या खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतीकरिता आवश्यक बाबींच्या खरेदीसाठी व शेतीकरीता पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वेळीच अर्थसहाय्यासाठी जिल्ह्यात 15 जून 2023 पर्यंत विविध योजनांचा लाभ नियोजन केले आहे.
कृषि विभागामार्फत बाह्य सहाय्यित प्रकल्प, विविध केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृति आराखडे अंतिम झाल्यानंतर केंद्र शासनाकडून वर्षभरात टप्याटप्याने निधी प्राप्त होतो. त्याचप्रमाणे, राज्य पुरस्कृत योजनांसाठी देखील वित्त विभागाकडून टप्याटप्याने निधी प्राप्त होतो. हा निधी टप्प्याटप्याने प्राप्त होत असला तरी कृषि क्षेत्राचे कामकाज हे हंगामनिहाय चालते. खरीप व रब्बी हंगामात लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रापैकी सुमारे 75 टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातच विविध पिकांची लागवड होते. त्यामुळे खरीप हंगाम हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना पूरक ठरणाऱ्या विविध योजनांतर्गत योजनांचे जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य या मोहिमेतून करण्यात येणार आहे.
अभियान राबविण्यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांसाठी अर्थसंकल्पीय अंदाज पुस्तकामध्ये मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या किमान 80 टक्के निधी उपलब्ध होईल असे गृहित धरुन उपरोक्त योजनांकरीता लाभार्थी निवडीची प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीद्वारे तातडीने सुरु करण्यात येऊन अभियानाकरीता जिल्हा व तालुका निहाय लक्ष्यांक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने आयुक्त, कृषि यांच्या मान्यतेने निश्चित करण्यात येईल.
कृषि आयुक्तालयाने 80 टक्के निधीच्या मर्यादेत जिल्हा व तालुका निहाय अस्थायी स्वरुपात आर्थिक व भौतिक साध्य निश्चित करुन द्यावेत आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे वार्षिक कृती आराखडे अंतिम झाल्यानंतर सुधारीत जिल्हा व तालुका निहाय आर्थिक व भौतिक साध्य क्षेत्रीय स्तरावर कळविण्यात येणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी अर्ज केलेले अर्जदार, योजनेचे नाव, पात्र / अपात्र अर्जदार, अपात्रतेची कारणे इ. तपशील अद्ययावत ठेवण्याच्यास सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र पुरस्कृत या योजनांचा असेल समावेश
राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक
राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण
राष्ट्रीय कृषि विकास योजना मृद आरोग्य व सुपिकता
राष्ट्रीय कृषि विकास योजना परंपरागत कृषि विकास योजना
राष्ट्रीय कृषि विकास योजना अवर्षन प्रवण क्षेत्र विकास
कृषि उन्नती योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान
कृषि उन्नती योजना राष्ट्रीय खाद्यतेल अभियान
कृषि उन्नती योजना बियाणे व लागवड साहित्य उपअभियान
कृषि उन्नती योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
कृषि उन्नती योजना कृषि विस्तार
आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य कृषि उन्नयन योजना
राज्य पुरस्कृत योजना
पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प
किमान आधारभूत किंमत व कृषि उत्पन्न बाजार समिती आधारीत दर यामधील फरकाची रक्कम बिजोत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत
सेंद्रीय / विषमुक्त शेती योजनेंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना
मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रीया योजना
जिल्हा कृषि महोत्सव योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना
पीक स्पर्धा
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि कृषि सेवा केंद्रांचे परवाने देण्यासाठी या अभियानांतर्गत विशेष मोहिम राबविणार आहे.
अभियांनात सहभागी होण्यासाठी व त्यांच्या लाभासाठी तालुका, उपविभाग अथवा जिल्हास्तरावरील कृषि कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.