नंदुरबार :(जिमाका वृत्तसेवा) – आदिवासी विकास विभागातंर्गत कार्यरत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार व तळोदा यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता परीक्षा 17 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 2:00 ते 3:30 या वेळेत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आली असल्याची माहिती, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की (तळोदा), प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी  एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धींगत व्हावे, त्यांना स्वयंअध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वत:ची गुणवत्ता सिध्द करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व्हावी व विकसित व्हावी ह्या हेतूने शिक्षकांची क्षमता परीक्षा घेण्यात येत आहे.

शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत कार्यरत 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शिखकांची एससीईआरटी, एनसीईआरटी या पाठ्यपुस्कातील अभ्यासक्रमावर आधारित क्षमता परिक्षा घेण्यात येणार आहे.

नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त शहादा, नवापूर व नंदुरबार या तीन तालुक्यातील 32 शासकीय आश्रमशाळा व 30 अनुदानित आश्रमशाळा मधील शिक्षकांची क्षमता परिक्षा शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नंदुरबार व एकलव्य मॉडेल स्कुल नंदुरबार येथे आयोजित करण्यात आली आहे.

तसेच तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त तालुक्यातील 42 शासकीय आश्रमशाळा व 21 अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांची क्षमता परिक्षा शासकीय आश्रमशाळा शिर्वे, दाब व तलाई या तीन परीक्षा केंद्रावर तालुका निहाय आयोजित करण्यात आली आहे.

प्रकल्प कार्यालय नंदुरबार व तळोदा अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या शिक्षकांनी क्षमता परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभाग आयुक्त श्रीमती नयना गुंडे, अपर आयुक्त नाशिक विभाग संदीप गोलाईत व प्रकल्प अधिकारी मंदार पत्की (तळोदा) चंद्रकांत पवार (नंदुरबार) यांनी केले आहे.