नंदुरबार –  शासनमान्यता प्राप्त कोविड रुग्णालय नसताना कोविड रुग्णांवर ॲपल हॉस्पिटलमध्ये उपचार होत असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सदर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

श्री.गिरासे यांनी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वळवी यांच्यासमवेत रुग्णालयाची पाहणी केली. या ठिकाणी इतर रुग्णासोबत कोविड बाधितांवर उपचार होत असल्याचे निदर्शनास आले. अशाने प्रशासनाच्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये बाध  निर्माण होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहितेतील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दाखल रुग्णांची स्थिती पाहून त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करावे आणि रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक अनुमती सक्षम प्राधिकाऱ्याकडून घेईपर्यंत रुग्णालय सील करण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.