नंदुरबार (जिमाका वृत्त): वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणालीद्वारे दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सर्व शासकीय जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच केलेले नगरपालिका व महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्यामार्फत वितरण वितरीत करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी…
♿️ दिव्यांग लाभार्थीने केंद्र शासनाच्या www.swaavlambancard.gov.in या संकेतस्थळावर आपली संपूर्ण वैयक्तिक व दिव्यांगत्वाची माहिती भरून ऑनलाईन अर्ज करावेत.
♿️ दिव्यांग व्यक्तिकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्यास हा अर्ज ऑनलाईन करता येतो. तसेच सुविधा केंद्रामध्ये अल्प मोबदला देवूनही भरता येईल.
♿️ अर्ज भरल्यानंतर अर्जाची पोहोच पावती प्राप्त होईल. या पावतीवर त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयांची यादी उपलब्ध आहे. त्यानुसार अर्जदारास त्यांच्या दिव्यांगत्व प्रकारानुसार घराजवळील रुग्णालयात तपासणीसाठी जाता येईल.
♿️ ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालय यांच्या लॉगीन आयडी वर उपलब्ध आहेत.
♿️ जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील अधिकारी, कर्मचारी हे या अर्जाची पडताळणी करतील.
♿️ पडताळणी केलेला ऑनलाईन अर्ज संबंधित दिव्यांगत्वाचे मुल्यांकन करणाऱ्या तज्ञाकडे पाठविला जाईल. संबंधित तज्ञ त्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मुल्यांकन करून ऑनलाईन संकेतस्थळावर तो अद्ययावत करेल.
♿️ हा अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग होवून दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश ऑनलाईन संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्याला वैश्विक ओळखपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होईल.
♿️ जिल्हा शल्य चिकित्सक अथवा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या कार्यालयाकडून ऑनलाईन कार्यान्वित कैलेल्या वैश्विक ओळखपत्र नेमलेल्या मुद्रण पुरवठादाराकडे ऑनलाईन हस्तांतरीत केले जाईल. ते मुद्रित झाल्यानंतर वैश्विक ओळखपत्रे संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांना स्पीड पोस्टद्वारे पुरवठादाराकडून घरपोच अग्रषित केले जातील.
अद्याप ज्या दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केलेला नाही त्यांनी वरील संकेतस्थळावर आपली वैयक्तिक पुर्ण माहिती तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरून वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. यासाठी अडचण आल्यास जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये श्री. वसावे यांनी कळविले आले.