नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते स्व.आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण करण्यात आले. विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री पाटील, महिला व बालविकास सभापती निर्मला राऊत, कृषि व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील, पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, बायजाबाई भील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते.
लोकसहभागातून चांगले कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे श्रीमती वळवी यांनी यावेळी सांगितले.
श्री.गावडे म्हणाले, पारितोषिक विजेत्या गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील अधिकाधिक गावे सुंदर करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करावे.
श्री.रौंदळ यांनी प्रास्ताविकात पुरस्कार योजनेविषयी माहिती दिली. स्व.आर.आर.पाटील यांनी ग्रामविकासासाठी बहुमूल्य योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत कोळदा ता.नंदुरबार, विसरवाडी ता.नवापूर, लोणखेडा ता.शहादा, रोझवे ता.तळोदा, भाबलपूर ता.अक्कलकुवा आणि खडक्या ता.धडगाव या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी विसरवाडी सरपंच बकाराम गावीत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सरपंच, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.