नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): वार्षिक उद्योग पाहणी अहवालाची माहिती देण्यासाठी सर्व उद्योगांनी सहकार्य करावे. कामाचे योग्य नियोजन करून शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व अचूक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले.
अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे 19 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत तीन दिवसीय कार्यशाळा नियोजन विभागाच्या अधिनस्त आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक, एस. चोकलिंगम, व प्रमुख पाहूणे म्हणून सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक औद्योगिक सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाता, राष्ट्रीय नमूना पाहणी विभागाच्या, पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार उद्योग विभागाचे प्रतिनिधी श्री.पी. डी. रेंदाळकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे आणि विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे दिनेश वाघ, सह संचालक व श्रीमती हर्षदा आंबकर, प्र.उप संचालक तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्र.उपसंचालक श्री. अ. द. पाटील आणि क्षेत्रकाम करणारे एकूण 164 अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत उपस्थित होते.
श्री.आहेर म्हणाले की, वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (जीडीपी) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो. राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येत असून निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम 2008 खालील तरतुदीनुसार माहिती देणे बंधनकारक आहे. वाटपाच्या क्षेत्रकामातून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीकोनातून सन 2021-2022 या वर्षांच्या क्षेत्रकामासाठी या माहितीचा उपयोग होतो. या प्रशिक्षणाचा पुरेपुर लाभ घ्यावा व जरी मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापूर्ण उपलब्ध करुन देणेच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या तसेच उद्योगांनी देखिल या कामी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपमहानिदेशक, सोम्या चक्रवर्ती म्हणाले की, जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद केली व माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देण्याचे महत्व अधोरेखित केले.
यशदाचे महासंचालक श्री. चोकलिंगम, यांनी देशातील सर्व्हेचा इतिहास माहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/ अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणांसह अतिशय रंजक पद्धतीने उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली. माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलल आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करून माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखिल सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. वार्षिक उद्योग पाहणीच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीमती दिपाली धावरे, उपसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनो वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. श्री. नवेन्द फिरके, सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यशाळेमध्ये श्री. रणबीर डे व श्री. बाप्पा करमरकर, उपसंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार कोलकाता, डॉ. प्रदिप आपटे, प्रख्यात अर्थतज्ञ व प्राध्यापक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्री. श्रीनिवास शिर्के आणि श्री. महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. जितेंद्र चौधरी, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थाच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), उपमहानिदेशक, यशदा, पुणे हे अध्यक्ष व श्री. पुष्कर भगूरकर, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.