नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2020 पर्यंत ‘लाळ-खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहिम’ राबविण्यात येत असून जिल्ह्यातील पशुपालकांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
लाळ-खुरकत हा पशुधनातील विषाणूजन्य रोग आहे. या रोगास लाळ्या, तोंडखुरी, पायखुरी असेही म्हणतात. प्रामुख्याने हा रोग पायात द्विखुरी असलेल्या जनावंरामध्ये आढळतो. या रोगाचा प्रसार हवेवाटे, हवा वाहणाऱ्या दिशेने, कळपातल्या कळपात बाधित जनावरांमुळे, जनावरांची पाणी प्यावयाची जागा, गव्हाणी व लागणारी भांडी , गुरांचे बाजार, आठवडी बाजार, जत्रा, पशुप्रदर्शने, साखर कारखाने, इत्यादी ठिकाणाहून अधिक प्रमाणात होतो.
या रोगामुळे जनावंरामधील मृत्यूदर जरी कमी असला तरी रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपाचा असल्याने गाई- म्हशींचे दूध देणे कमी होते. तसेच शेतीकाम, ओढकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांमध्ये अशक्तपणा येऊन शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊन बैलांपासून होणाऱ्या शेतीकामास व ओढकामास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
केंद्र पुरुस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तसेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील 100 टक्के पशुधनास लसीकरण करण्यात येणार आहे. त्यात गायवर्ग 3 लाख 36 हजार नऊशे सात, म्हैसवर्ग 72 हजार 100, शेळ्या 2 लाख 72 हजार सातशे त्र्येपन्न, मेंढ्या 15 हजार दोनशे शहात्तर असे एकूण 6 लाख 97 हजार छत्तीस पशुधनास सहा महिन्यांच्या अंतराने वर्षांतून 2 वेळा लसीकरण करावयाचे आहे. यासाठी पहिल्या फेरीसाठी जिल्ह्यास 3 लाख 41 हजार लसी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातील 100 टक्के जनावरांची ओळख पटविण्यासाठी कानात लावावयाचे टॅग व ॲपलिकेटरही या मोहिमेतंर्गत लावण्यात येणार आहेत.
लसीकरण केल्यामुळे जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन त्यांना रोगाची लागण होत नाही. लसीकरणासाठी शेतकऱ्यांनी तसेच पशुपालकांनी जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून कळपातील 4 ते 6 महिने वरील सर्व जनावरांना लाळ खुरकत प्रतिबंधक लसीकरण करावे.