नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : दुर्गम भागातील 18 वर्षावरील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण दोन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी गावपातळीवरील सूक्ष्म नियोजन करावे आणि मोहिमस्तरावर लसीकरणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दोन तर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात 4 पथकांची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, प्र.तहसिलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी नंदकिशोर सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजेश शिंटे आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, लसीकरणासाठी प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, 2 परिचारीका आणि दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. शिक्षकांनी जनतेच्या मनातील शंकांचे निरसन करून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत करावे. दोन महिन्याच्या कालावधीत संपुर्ण तालुक्यातील पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण होईल यानुसार नियोजन करावे.
येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवून पात्र व्यक्तींची नोंदणी करण्याचे काम केंद्र प्रमुखांनी सुरू करावे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदी गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य घेण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
श्री.गावडे म्हणाले, सर्व यंत्रणांनी एकत्रिपणे गावतपाळीवरील नियोजन करावे. परस्पर समन्वय साधून अधिकाधिक प्रमाणात लसीकरण होईल यादृष्टीने प्रयत्न करावे. लसीकरणाबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यात यावी.
बैठकीस अक्कलकुवा तालुक्यातील सर्व खातेप्रमुख, नायब तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
अक्कलकुवा कोविड केअर सेंटरला भेट
जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय येथील डेडीकेटेड कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील सुविधेबाबत समाधान व्यक्त केले. या रुग्णालयात 15 खाटांची व्यवस्था असून त्यापैकी 6 ऑक्सिजन सुविधा असणाऱ्या खाटा आहेत. रुग्णालय परिसरातील लसीकरण केंद्र, खापर येथील कोविड केअर सेंटर आणि आरोग्यवर्धिनी केंद्रालाही डॉ.भारुड यांनी भेट दिली.