नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात येत्या 17 जानेवारीला होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबत यंत्रणेने आवश्यक ते नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम जिल्हा कृती दल समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.व्ही.डी.सातपुते आदी उपस्थित होते.

            यावेळी डॉ.भारुड म्हणाले की, जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील एक लाख 92 हजार 234 बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार असल्याने मोहिमेचे आरोग्य विभागाने नियोजन करावे. प्रत्येक बालकाला पोलीओचा डोस दिला जाईल याची पर्यवेक्षीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. बसस्थानकावरील प्रवासी, ऊसतोड कामगार, विटाभट्टी कामगार, बांधकाम व रस्त्याची कामे करणाऱ्यामजूराच्या बालकांना पोलिओ डोस देण्यात यावेत.

            लहान बालकांना पल्स पोलिओचे डोस दिले जाणार असल्याने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने योग्य ती दक्षता बाळगावी. लसीकरणाच्या वेळी यंत्रणेने सामाजिक अंतराचे पालन करावे आणि  मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. लाभार्थ्यांच्या पालकांना गृहभेटीद्वारे समक्ष लसीकरणाच्या स्लिपचे वाटप त्वरीत पुर्ण करावेत. स्लिपवर लसीकरणाची दिनांक, वेळ व स्थळाची माहिती द्यावी असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.