नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांनी तयार केलेले घटकसंच राज्यभरातील शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याने, ते अत्यंत गुणवत्तापूर्ण तयार केले जातील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी श्री सतीश चौधरी यांनी केले. नंदुरबार येथे आयोजित घटक संच निर्मिती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डीएसके रेसिडेन्सी हॉटेलच्या सभागृहात जिल्ह्यातील निवडक शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय ब्लेंडेड मोड व ऑनलाईन घटक संच निर्मिती कार्यशाळा दिनांक 15, 16 व 17 डिसेंबर 2022 या कालावधीत संपन्न होत आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. सतीश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संशोधन विभाग प्रमुख तथा वरिष्ठ अधिव्याख्याता श्री प्रवीण चव्हाण, संशोधन उपविभागप्रमुख तथा अधिव्याख्याता श्री पंढरीनाथ जाधव, विषय सहायक श्री. देवेंद्र बोरसे यांच्यासह घटक सच निर्मिती कार्यशाळेचे सुलभक केंद्रप्रमुख श्री हिरामण वाघ, विषय तज्ञ श्री आर आर पाटील हे उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध
शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अध्यापक, विविध प्राथमिक व माध्यमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक यांच्या सहभागाने नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत कृती संशोधन व नवोपक्रम या विषयावर ब्लेंडेड मोड व ऑनलाईन घटक संच निर्मिती केली जात आहे. या ठिकाणी निर्मित केलेले घटकसंच संपूर्ण राज्यातील शिक्षकांना मार्गदर्शक ठरणार आहेत. या तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी यांनी सांगितले की, आता प्रशिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. तसेच शिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. यापुढे विविध शिक्षण व शिक्षणाच्या प्रक्रिया या अशाच पद्धतीने राबवल्या जाणे निश्चित आहे. नंदुरबार जिल्ह्यातील निवडक शिक्षकांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासाठी हा घटक संच तयार केले जाणे, हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे. तो गुणवत्तापूर्ण तयार करण्यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी सर्व सहभागी संशोधकांना शुभेच्छा देताना कृती संशोधन व उपक्रमाच्या गरजा आणि महत्त्व विषद करून संशोधन करण्यासाठी शिक्षकांना प्रेरणा मिळेल याची जाणीव ठेवून घटक संच निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले व सहभागी सदस्यांना शुभेच्छा दिल्या.