नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा ) : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी नवापूर येथे भेट देऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आढावा घेतला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार सुनिता जऱ्हाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीची पाहिणी केली आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी उपजिल्हा रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली. त्यांनी बेडकी पाडा येथे मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाला भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला.
डॉ.भारुड यांनी सर्वेक्षणाचे चांगले काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. सर्वेक्षणाचे काम 5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे आणि ऑनलाईन नोंदी घेण्याचे कामही लवकर पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्वेक्षणाबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.