नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य” पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शनिवार 30 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता देशभरातील ऊर्जा विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात NIC द्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

या कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ऊर्जा विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या देशभरातील निवडक लाभार्थ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नंदूरबार, वर्धा, कोल्हापूर, गडचिरोली आणि नाशिक या पाच जिल्ह्यातील केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचे लाभधारक या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, लोकप्रतिनिधींसह वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे.