नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : प्लास्टीक निर्मुलनासाठी सर्व स्तरातून व्यापक जनजागृती करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृतीदलाच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता स्वप्निल पाटील, सहायक अभियंता जितेंद्र मोहिते आदी उपस्थित होते.

श्री.खांदे म्हणाले की, प्लास्टीकच्या अतिवापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असुन प्लास्टीकच्या अविघटनशील कचऱ्यामुळे मोठया प्रमाणात नैसर्गिक अधिवास, पर्यावरण तसेच सागरी जीव, वन्य जीव व मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी प्लास्टीक निर्मुलनासाठी सर्व नागरिकांनी प्लास्टीक पिशवीचा वापर करणे टाळावे. नागरिकांनी भाजीपाला व इतर सामान घेण्यासाठी कापडी पिशव्याचा वापर करावा. यासाठी शैक्षणिक संस्था, एनसीसी, एनएसस, स्काऊट, युवा संघटना, इको क्लब, तसेच स्वंयसेवी संस्थांनी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी.

प्लास्टीक कचरा व्यवस्थापन नियम 2021 च्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधीसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निधीचा वापर करावा. प्लास्टीकच्या बदल्यात बांबू, कापडी पिशवीचा वापर करावा. पर्यावरणपूरक पिशव्या निर्मितीसाठी बचतगट तसेच त्याउत्पादन करणाऱ्या उत्पादकांना प्रोत्साहन करावेत. बंदी घातलेल्या एकल वापर प्लास्टीकच्या पिशव्यासंदर्भात किराणा, दुकानदार, व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. तसेच बंदी घातलेल्या प्लास्टीकच्या पिशवी विक्रेत्यांवर नगरपालीकेने कठोर कारवाई करावी. प्लेवर ब्लॉक तसेच रस्ता निर्मितीसाठी विघटन करणाऱ्या प्लास्टीकचा वापर करावा असे त्यांनी सांगितले. बैठकीस सर्व मुख्याधिकारी आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.