नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीत केंद्र सरकार व राज्य शासनातर्फे ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाने आपला कृती आराखडा तयार करुन जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी आज दिले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, या महोत्सवाचे समन्वयक तथा जिल्हा पुनवर्सन अधिकारी (ससप्र) नितीन सदगीर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, आगार व्यवस्थापक मनोज पवार, सहाय्यक निबंधक एस. जी. खैरनार, पोलिस निरीक्षक भरत जाधव, लेखाधिकारी मिलिंद सांगळे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. एच. माळी, व्ही.व्ही. सोनार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून या गौरवशाली पर्वानिमित्त आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्याचे केंद्र सरकारने निर्देश आहेत. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम रहावी व त्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने देशभरात 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांवर तसेच प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरीकांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका यांनी आपआपल्या क्षेत्रात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनबध्द कार्यक्रमांची आखणी करावी. हा उपक्रम राबविताना भारतीय ध्वजसंहितेचे पालन होईल याकडेही लक्ष द्यावे. तसेच जनजागृतीसाठी वॉकेथॉन, सायक्लोथॉन, विविध स्पर्धा, प्रभातफेरीचे आयोजन, 9 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन व वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. शिवाय 15 ऑगस्ट रोजी जिल्हा व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 75 फूट उंच राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक घर व इमारतींवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रध्वज खरेदी करावेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे. तिरंगा तयार करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहांनी सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी केले.