नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी आवश्यक क्लोरीन, औषधी उपलब्ध राहील असे नियोजन करावे. आरोग्य विभागाने औषधसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी यावेळी दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पूर्व तयारीची माहिती बैठकीत दिली.