नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एव्हरेस्टवीर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आंनद बनसोडे यांच्या टिम सोबत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरो या शिखरावर 360 एक्स्प्लोर्सच्यावतीने चढाई करण्याकरिता अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाटच्या अनिल वसावेची निवड झाल्याने त्याला पुढील तयारीसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड .के.सी.पाडवी यांच्या हस्ते 3 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
अतिदुर्गम भागात राहणाऱ्या अनिलला गरीबीच्या परिस्थितीमुळे मोहिमेवर जाणे शक्य नव्हते. ही बाबत पालकमंत्री पाडवी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मदत देण्याबाबत आदिवासी विकास विभागाला सूचना दिल्या. प्रकल्प कार्यालयातर्फे न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत तात्काळ कार्यवाही करण्यात आली व पुढील मोहिमेसाठी आवश्यक मदत अनिलला देण्यात आली.
आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलो मांजरो चढाई करण्याकरिता विविध स्पर्धामधुन 10 गिर्यारोहकांची निवड करण्यात आली आहे. ही टिम 20 जानेवारी रोजी मोहिमेला सुरुवात करुन 26 जानेवारीला भारताचा तिरंगा झेडा तेथे फडकविणार आहे. अनिलने मोहिम यशस्वी करीत जिल्ह्याचा नावौकीक वाढवावा व यापुढेही असेच यश संपादन करावे, अशा शुभेच्छा पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी युवकाला अफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर चढाई करुन जिल्ह्याच्या नावलौकीकात भर घालण्याची संधी मिळणार आहे. अशी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनिल वसावे यांने शासन तसेच प्रशासनाला धन्यवाद दिले आहे.