नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबारतर्फे नवापूर येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते खावटी कीटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, तहसिलदार मंदार कुलकर्णी, दिलीप नाईक, अजित नाईक, दिपक नाईक, ॲड. गोवाल पाडवी आदी उपस्थित होते.
ॲड. पाडवी म्हणाले, राज्यातील आदिवासी बांधवांना घरकूल उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येणार असून 12 हजार नागरिकांना घरकूलाचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात लालबारी, तिनटेंभा, देवळफळी आणि नयाहोंडा येथील 892 कुटुंबांना खावटी कीटचे वाटप करण्यात आले. त्यांच्या हस्ते नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्रीमती वळवी आणि आमदार नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालनक करावे असे आवाहन श्री.नाईक यांनी केले.