नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, कार्यकारी अभियंता योगेश कुळकर्णी, तहसिलदार बाळासाहेब थोरात,अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, माजी मंत्री पद्माकर वळवी, होळच्या सरपंच सरुबाई कोतवाल आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्याना चांगल्या सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना काळातही पोलीस दलाने उत्तम कामगिरी केली. पोलीसाची कामगिरी अधिक चांगली व्हावी यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील. पोलीसानी कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले. परस्पर सहकार्याच्या भावनेतून जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामामुळे जिल्ह्याची वेगाने प्रगती होत आहे असेही ते म्हणाले.
खासदार गावीत म्हणाल्या, रेल्वे लाईनचा परिसर असल्याने या भागासाठी पोलीस ठाण्याची इमारत महत्वाची ठरेल. शहराचा विस्तार लक्षात घेता पोलीसांसाठी सुसज्ज इमारतीची गरज होती. पालकमंत्र्याच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.पंडीत म्हणाले जिल्ह्यातील 12 पोलीसाच्या इमारतीपैकी सर्वात सुसज्ज इमारत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यासाठी उभारण्यात आली आहे. 90 लाख रुपये खर्चाच्या या इमारतीत अन्य सुविधासाठी जिल्हा वार्षिक योजनेतुन 33 लाख रुपये मिळाले आहेत. पोलीसाना मिळालेल्या नवीन वाहनामुळे दुर्गम भागातील पोलीस अधिकाऱ्यांना अधिक चांगले काम करता येईल.
प्रास्ताविकात श्री.हिरे यांनी इमारती विषयी माहिती दिली. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.