नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिंक  निवडणुकीसाठी 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होत असल्याने यंत्रणेने  योग्य नियोजन करुन मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. गमे यांच्या अध्यक्षतेखाली रंगावली सभागृहात निवडणूकीशी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की, पुलकींत सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शाहुराज मोरे,  उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे आदि  उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. गमे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील 23 मतदान केंद्रांवर  निवडणूक तपशील व केंद्र क्रमांक लिहीण्यात यावेत, प्रत्येक मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. मतदान केंद्रांवर अखंडित व्हिडीओशुटींग करण्यासाठी व्हिडीओग्राफरची नेमणूक करण्यात येवून याठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मतदान केंद्रावर 2 पोलींग ऑफीसरची नेमणूक करावी. मतदार यादी छापून त्या उमेदवारांना वितरीत कराव्यात. मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकाची नियुक्ती करावी. पोलीस विभागाने मतदान केंद्रावर आवश्यक बंदोबस्त तैनात करावा. झोनल अधिकाऱ्यांना बॅलेट बॉक्स बंद करण्याचे प्रशिक्षण तसेच केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे मतपेट्या हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात यावेत. मतदान पथकाकरिता वाहनाची व्यवस्था करावी. 

मतदान झाल्यानंतर मतपेट्या व संविधानिक, असंविधानिक लिफाफे व इतर साहित्य मतमोजणीच्या ठिकाणी नेण्याकरीता वाहनाची व्यवस्था करावी. सिमावर्ती भाग असल्याने मतदानाच्या दिवशी दारुबंदीचे आदेश निर्गमीत करावे. मतदान साहित्य ताब्यात देताना आवश्यक ती काळजी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांचेवर सोपविलेली जबाबदारीचे तंतोतंत पालन करुन निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांसह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, विधान परिषद निवडणूकीसाठी आदर्श आचारसंहिता पालनाच्या सुचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून पेड न्यूज समिती, सनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे तसेच आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. निवडणूकीसाठी  नंदुरबार जिल्ह्यात 23 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तेथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून या अधिकाऱ्यांचा पहिला प्रशिक्षण वर्गही पार पडला आहे. दुसरे प्रशिक्षण 23 जानेवारी व तृतीय प्रशिक्षण व साहित्य वाटप 29 जानेवारी रोजी घेण्यात येणार असून मतदान साहित्य वाटप व मतपेट्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 पोलीस अधिक्षक यांनी निवडणूकीसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.

असे आहेत मतदार..

नंदूरबार जिल्ह्यात 13 हजार 146 पुरुष, 5 हजार 770 महिला व 2 तृतीयपंथी असे एकूण 18 हजार 918 इतके मतदार नाशिक पदवीधरसाठी आहेत. अक्कलकुवा तालुक्यात 967 पुरुष, 288 महिला एकूण  1 हजार 255, अक्राणी 715 पुरुष, 186 महिला एकूण 901, तळोदा 1 हजार 251 पुरुष, 482 महिला एकूण 1 हजार 733, शहादा 3 हजार 536 पुरुष, महिला 1 हजार 751 एकूण 5 हजार 287 तर नंदुरबार तालुक्यात 4 हजार 997 पुरुष,महिला 2 हजार 340, तृतीयपंथी 2 असे 7 हजार 339 तसेच नवापूर तालुक्यात 1 हजार 680 पुरुष तर महिला 723 असे 2 हजार 403 मतदार आहेत.