नंदुरबार (जिमाका वृत्त): पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करुन 15 मे पर्यंत सादर करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्री.खांदे बोलत होत. बैठकीस उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, महावितरचे अधिक्षक अभियंता अ.ए.बोरसे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.उमेश पाटील, जिल्हा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज परिहार, पोलीस उपनिरीक्षक अविनाश पंडीत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे, सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री.खांदे यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
मान्सूनपुर्व रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कार्यालयप्रमुखांनी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये. संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. आपत्तीच्या वेळी आवश्यक असणारे साहित्य तपासून घ्यावे. धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्याठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. पूरग्रस्त व दरडग्रस्त गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावे. कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा.
आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी. तसेच बंधाऱ्याचे दरवाजे, गेट कार्यान्वित होतात किंवा नाही याची तपासणी करावी. पाटंबधारे विभागाने धरणांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपायययोजना कराव्यात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या मुरूम टाकून भराव्यात. चरणमाळ घाट परिसरात चढ उताऱ्यांच्या ठिकाणी संदेश प्रसारीत करावेत.
नगरपालिकेने शहरातील नालेसफाईबाबत आढावा घ्यावा व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.पाटबंधारे विभागाने दैनंदिन पाणीसाठा, विसर्ग, पर्जन्यमान आदी माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी. पुरवठा विभागाने आपत्ती काळात दुर्गम भागातील नागरिकांसाठी पुरेसा धान्यसाठा वितरणाबाबत नियोजन करावे. महावितरणने विद्युत वाहिन्यांचे आवश्यक कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.