नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मकर संक्राती सणाच्या वेळी प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूचा वापर करून बनविण्यात आलेल्या नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक व हाताळणी करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम 1986 अन्वये प्रतिबंध केला आहे.
नायलॉन मांजामुळे पक्षी व मानव जिवितांस इजा होते. काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. मकरसंक्राती सणाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो. पतंगासह तुटलेले नायलॉन मांजाच्या धाग्यांचे तुकडे जमिनीवर पडतात नायलॉन मांजाचे तुकडे हे लवकर विघटन होण्याजोगे नसल्याने गटारे व नदी-नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण करतात. तसेच नायलॉन मांजाचे तुकड्यामुळे गाय अथवा तत्सम प्राण्यांनी नायलॉन मांजाचे तुकडे समाविष्ट असलेले खाद्य सेवन केल्यामुळे त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. अशा धाग्यांमधील प्लास्टिकच्या वस्तुंमुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम होतात. माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरते.
नायलॉन मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अशा धाग्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, तसेच साठवणुकदार यांनी तत्परतेने नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक थांबवावी. वर्षभरात त्यांची साठवणूक, हाताळणी व विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. पतंग उडवितांना केलेल्या माजांच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवीत हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता असल्याने, याबाबतची आवश्यक ती खबरदारी घ्यावी असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.