नंदुरबार (प्रतिनिधी):- जिल्हयात कोरोना कोविड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी व ग्रामिण भागातील संस्था व इतर संस्थामध्ये निर्जतुकीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. याअंतर्गत नागरी भागातील संस्था – ट्रव्हल्स बसेस, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, खाजगी दवाखाने, सार्वजनिक उद्याने, सार्वजनिक बेचेस , तसेच ग्रामिण भागातील संस्था – ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, शासकीय दवाखाने, पोस्ट ऑफीस, सर्व शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक वाचनालये आदी कार्यालय, सार्वजनिक स्थळे व शासकीय वाहने एकत्रितरित्या निर्जतुकीकरण केले जात आहेत.
या निर्जंतुकिकरण कार्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, 1 % सोडीयम हायपो क्लोराईड सोल्युशनचा वापर करण्यात यावा. सदर सोल्युशन तयार करतांना 1 किलो ग्राम ब्लिचींग पावडर ( TCL ) ही 30 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्याचा निर्जतुकीकरण करण्यासाठी वापर करावा. सद्यास्थितीत बाजारात 5 % सोडीयम हायपो क्लोराईड सोल्युशन उपलब्ध असल्याने व त्याचा वापर करावयाचा असल्यास 1 लिटर सोडीयम हायपो क्लोराईड सोल्युशन ( 5 % ) व 4 लिटर पाणी मिसळून त्याचे द्रावण निर्जतुकीकरण करण्याकरिता वापरावे. नॅपसॅक पंपमध्ये हे द्रावण भरुन कार्यालयातील व सार्वजनिक स्थळावरील छत, भित व तळ यावर फवारणी करण्यात यावी. फवारणी किमान 1.5 मीटर अंतरावरुन करण्यात यावी. फवारणी केल्यानंतर किमान 10 मिनीट सदर वस्तुचा वापर करण्यास टाळावा. याप्रमाणे कार्यालय व सार्वजनिक स्थळे दिवसातुन किमान 2 वेळेस (सकाळी 8.00 ते 9.00 वाजता व सायंकाळी 5.00 ते 6.00 वाजता) फवारणी करण्यात यावी. संपूर्ण गावातील घरांची व जनावरांच्या गोठयाची फवारणी करावयाची असल्यास दररोज किमान एक वेळेस फवारणी करण्यात यावी. कार्यालयातील टेबल, खुर्च्या, ग्रिल, दरवाजे व इतर स्पर्श होणाऱ्या वस्तुंचे मॉपींग या द्राव्याने दिवसातून दर 3 तासाने करण्यात यावे. सर्व कार्यालयाच्या बाहेर हात धुण्याकरीता पाणी व साबण किंवा हॅन्ड वॉशची निरंतर व्यवस्था करण्यात यावी, ज्या व्यक्तींना घरात विलगीकरण केलेले आहे, अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले कप, जवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तु घरातील इतर व्यक्तींना वापरण्यात देण्यात येवू नये. संस्थेसाठी निर्जतुकीकरण करण्याच्या मार्गदर्शक सुचना लॉयसॉल आय. पी. (50 % क्रीसाल व 50 % लिक्वीड सोप) यांचा वापर करावा.
बसस्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, बसेस, रेल्वेगाड्या, वाहने, मॉल, चित्रपटगृह, लग्न सभागृह हॉल यांचे निर्जतुकिकरण करण्यासाठी 2.5 % लॉयसॉल अर्धा लिटर लॉयसाल 19 लिटर पाण्यामध्ये वापर करावा. हॉस्पीटल, क्लीनिक आणि रुग्णवाहीका निर्जतुकिकरण करण्यासाठी 5 % लॉयसॉल (1 लिटर लॉयसॉल 9 लिटर पाण्यामध्ये) चा वापर करावा. लॉयसॉल आय पी (50 % क्रीसॉल व 50 % लिक्वीड सोप) उपलब्ध नसल्यास सोडीयम हायपो क्लोराईड सोल्युशनचा वरीलप्रमाणे वापर करावा, आशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी याबाबतचे पत्र सर्व संबंधितांना दिले आहे.