नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यात यावी. फिरत्या पथकामार्फत गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.

नवापूर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,  तहसिलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी महेश चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मावची आदी उपस्थित होते.

 डॉ.भारुड म्हणाले, जनतेतील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. शिक्षकांनी गावात जाऊन पात्र व्यक्तींची नोंदणी करावी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे. गावात कोरोनाबाधित आढळल्यास त्यास त्वरीत संस्थात्मक अलगीकरणात दाखल करावे, असे त्यांनी सांगितले.

            तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय विसरवाडी आणि खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली. त्यांनी नवापूर ट्रामा केअर सेंटर इमारत आणि  ऊर्दु हायस्कूल  येथील लसीकरण केंद्रालाही भेट दिली.