नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र मिरज संस्थेमार्फत सन 2022-2023 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून 31 जुलै 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
या संस्थेमार्फत किमान आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) आणि किमान नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटार ॲण्ड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स ) करिता प्रवेश दिला जातो.
प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा असून प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय राहील. अद्ययावत परीपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेट आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना समाज कल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यात येईल.
प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.
प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता.मिरज, जि. सांगली पिनकोड 416410 (दूरध्वनी क्रमांक 0233-2222908)(भ्रमणध्वनी क्रमांक 9922577561/9975375557 येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त दिव्यांगानी या योजनेचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या अधिक्षकांनी कळविले आहे.