धुळे (प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील मद्यप्रेमींसाठी यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारुची होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी चे माजी जिल्हाध्यक्ष श्री संदिप बेडसे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रसरकारने ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरसकट मद्य विक्रीला परवानगी दिली होती. त्या निर्णयामुळे सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या निर्णयाला विरोध ही होत होता. मात्र, त्यावर काही पर्याय म्हणून दारूची होम डिलिव्हरी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते संदीप बेडसेंनी ट्विटर च्या माध्यमातून सरकारला केली होती. त्यावर सकारात्मक चर्चाही झाली होती. त्यांच्या मागणीला सरकारने प्रतिसाद दिला आहे.


अटी आणि नियमानुसार भारतीय बनावटीचे विदेशी मद्य स्पिरिटस, बिअर, सौम्य मद्य, वाईनची परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. दारूच्या होम डिलिव्हरीसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तीने मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचना उत्पादन शुल्क विभागाने दिल्या आहेत.
ई टोकनची सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना दारु खरेदी करायचे आहे, अशा ग्राहकांनी या संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करून ई-टोकन प्राप्त करणे गरजेचे आहे. संकेतस्थळावर माहिती सबमिट केल्यानंतर त्यानुसार ग्राहकास आपल्या नजीक असणाऱ्या वाईन शॉपची यादी दिसेल. त्या दुकानांपैकी एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकाला करता येईल. आवश्यक माहिती नमुद केल्यानंतर ग्राहकास ई – टोकन मिळेल. सदर टोकनद्वारे ग्राहक आपल्या सोईच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून दारू खरेदी करु शकणार आहे.