नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले असताना शेजारील जिल्ह्यातील नागरीक नंदुरबार जिल्ह्यात लस घेण्यासाठी बेकायदेशीररित्या प्रवेश करीत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अन्य जिल्ह्यातील नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश करण्यास व त्यांचे लसीकरण करण्यास बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.
नंदुरबार जिल्हा आदिवासी बहूल व दुर्गम जिल्हा आहे. बाहेरील नागरीक येथे लसीकरणासाठी येत असल्याने लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासोबत कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता आहे. तसेच लसीकरणासाठी मर्यादीत प्रमाणात प्राप्त डोस विचारात घेता स्थानिक नागरिक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.
आंतर जिल्हा बंदी असल्याने अन्य राज्य किंवा जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या पासेसची पडताळणी करण्यात यावी. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. अन्य जिल्ह्यातील नागरीक लसीकरणासाठी आल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना त्यांच्या जिल्ह्यात लसीकरण करून घेण्याबाबत कळविण्यात यावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तसेच भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.