नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सद्यस्थितीत कोविड-19 बाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्या हित लक्षात घेवून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शैक्षणिक प्रशाळा, विभाग व विद्यापीठाशी संलग्नित नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि मान्यता प्राप्त परिसंस्थामधील वर्ग 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी अटी व शर्तींच्या अधिन राहून मान्यता दिली आहे.

महाविद्यालयांना कोविड-19 अंतर्गत केंद्र शासन/राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.  कोराना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शारिरीक अंतर पाळून व्यक्तीमध्ये भौतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रामधील महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी नसेल. प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांचे क्षेत्र पूर्ववत सूरू होईपर्यंत प्रवेश देण्यात येऊ नये.

महाविद्यालयीन प्राध्यापक, इतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवहीत दररोज अद्ययावत करावी जेणेकरुन संशयित रुग्ण आढळल्यास संपर्क साखळी शोधणे सोईचे होईल.  महाविद्यालयात साबणाने हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे प्रवेशापूर्वी प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझरची व्यवस्था अनिवार्य राहील. कोविड-19 साथरोग संबंधी सर्दी-खोकला, ताप, श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश देवू नये. शासन निर्धारीत शुल्क पेक्षा जास्त शुल्क विद्यार्थ्याकडून घेण्यात येवू नये. शक्यतो हँण्डग्लोजचा वापर करावा. मास्क लावणे बंधनकारक राहील.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जागेची उपलब्धता पाहुन 50 टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्यात यावा. जिल्हा प्रशासन, तालुका शासन  व आरोग्य विभागाचा संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्यात यावा. कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या आरोग्य विभागाच्या दिलेल्या सूचना दर्शनी भागात लावाव्यात व सूचनांचे पालन होईल यादृष्टीने कार्यवाही करावी.

 विद्यार्थांना उपस्थित राहण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. महाविद्यालय अनेक दिवस बंद अवस्थेत असल्याने त्यांची स्वच्छता आणि सॅनेटाईझ करुन घ्यावे. तसेच त्यांचे इलेक्ट्रीक/सेफ्टी ऑडीट करुन घेण्यात यावे. विद्यार्थांच्या कुटुंबात अथवा निवासस्थान परिसरात कोविड-19 चा रुग्ण नसल्याची खात्री करावी. प्रत्येक महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करणे बंधनकारक राहील.

 प्रत्येक महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आरोग्यकार्ड तयार करुन शारिरीक तापमान, सर्दी-खोकला यांच्या दैनंदिन नोंदी घेण्यात याव्यात. कोविड-19 शी संबंधित वेळोवेळी निर्गमित होणारे शासन परिपत्रक, आदेश निर्णय व या कार्यालयाचे पत्र व आदेशाचे पालन करण्यास कसूर केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधिता विरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.

कोणत्याही व्यक्ती, शैक्षणिक संस्था यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे विद्यापिठाच्या कुलसचिवांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.