नंदुरबार-जिभाऊ करंडक स्पर्धेमुळे महाराष्ट्र राज्याच्या नाट्य चळवळीत नंदुरबारचे नाव कोरले गेले आहे, असे आम्हास वाटते. या स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हा कल्चरल ऍकेडमीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांनी केले. ते येथील जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्यातर्फे एम स्न्वेअर वेल्थ मॅनेजमेंट नाशिक प्रायोजित राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, किरण तडवी, मिलिंद पहुरकर, शितलभाई पटेल, नगरसेवक रविंद्र पवार, डॉ.राजकुमार पाटील, संजय चौधरी, पत्रकार रमाकांत पाटील, रणजीत राजपूत, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, डॉ.चेतन चौधरी, प्रभाकर भावसार, मिरा मनोहर आदी उपस्थित होते. यावेळी नाटककार रविंद्र लाखे मनोगतातून म्हणाले, की जिभाऊ करंडक या राज्यस्तरीय स्पर्धेत सातत्य ठेवल्यास नक्कीच नंदुरबार येथून कलावंत व नाट्य तंत्रज्ञ उदयास येतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागसेन पेंढारकर यांनी केले. सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी तर आभार एन.टी.पाटील यांनी मानले. या स्पर्धेचे परिक्षण नाटककार रविंद्र लाखे, नाट्य लेखक दत्ता पाटील, नाटककार अजित भगत हे करीत आहेत. आज स्नेहयात्री प्रतिष्ठान (भुसावळ)-वारी जावा, मॅड स्टुडीओ (धुळे)-रात्र वैराची आहे, जनायक थिएटर्स (जळगांव)-करट छबी, समर्थ बहुउद्देशीय संस्था (एरंडोल)-लाल चिखल, प्रताप महाविद्यालय (अमळनेर) असणं-नसणं, सिद्धांत बहुउद्देशीय संस्था (धुळे)-नेकी, लोकमंगल कलाविष्कार (धुळे)-कात, नुतन मराठा महाविद्यालय (जळगांव)-हलगी सम्राट या एकांकीकेचे उशिरापर्यंत सादरीकरण सुरु होते. आज (दि.४) रोजी एकुण दहा एकांकीकेचे सादरीकरण होणार आहे. या सर्व एकांकीका पाहण्यासाठी जिल्हावासियांनी नाट्य गृहात येण्याचे आवाहन नागसेन पेंढारकर, मनोज पटेल, मनोज सोनार, राजेश जाधव व समस्त जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.