नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  जागतिक आदिवासी दिनानिमित्ताचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “आदिवासी नृत्य महोत्सव ” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 9 ऑगस्ट, 2022 रोजी नंदुरबार येथे करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, विभीषण चवरे, यांनी दिली आहे.

            जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका  जंगलात मिळणाऱ्या रानमेवाव्यावर करीत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ब्रिटीश या देशावर राज्य करण्यासाठी आले, तेव्हा त्यांना आदिवासींनी सर्वप्रथम कडक निषेध सुरु केला आणि स्वातंत्र्यलढ्याचे रणशिंग फुंकले. जगातील आदिवासींचा आंतरराष्ट्रीय दिवस हा प्रत्येक वर्षी 9 ऑगस्ट, रोजी जगातील आदिवासींच्या जागृतीसाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.  यामध्ये पर्यावरणीय संरक्षणासारख्या जागतिक समस्या सुधारण्यासाठी आदिवासी लोक करत असलेल्या कर्तृत्वे आणि योगदानास देखील समावेश होतो. अशा या जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून  “आदिवासी नृत्य महोत्सव” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 9 ऑगस्ट, 2022 रोजी, दुपारी ३.०० वाजता, शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा, नंदुरबार येथे करण्यात आलेले आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोलनृत्य, नंदीनृत्य, बोहाडा, तारपानृत्य, तुरनाच, घांगळी आदि आदिवासी पारंपारिक नृत्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. या नृत्यांमध्ये काशिनाथ दिघा, धवलु भोगाडे, देऊ मुरथडे,  कैलाश माळी, अर्जुन नगडे, माहू खरपडे, कृष्णा धावर या आदिवासी कलावंताचा आणि नंदुरबार शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींनीचा सहभाग असेल.  सदर कार्यक्रमाचे संकल्पना व सादरीकरण आदिवासी प्रबोधन कला क्रिडा विद्या संस्था, मोखाडा जिल्हा पालघर यांची असून कार्यक्रमाचे समन्वयक श्री.राजन वैद्य हे आहेत. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक, विभीषण चवरे यांनी केले आहे.